नवी दिल्ली : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने मोर्चा उघडला आहे. थोड्या ब्रेकनंतर आज ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दिल्लीतील रामलीला मैदानावर महारॅली होत आहे. प्रक्रिया आणि कोट्यवधी नागरिकांची नावं मतदार याद्यांबाहेर फेकल्या गेल्याने महाआंदोलन होत आहे. त्याचवेळी राहुल गांधी हे मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मोठा नवीन खुलासा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. काल प्रति संसदेत त्यांनी याविषयीची हिंट दिली. ज्ञानेश कुमारांविरोधात अत्यंत गंभीर आरोप आणि मोठा खुलासा करण्याच्या ते तयारीत आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
मॉक पार्लमेंटमध्ये राहुल गांधींचा एल्गार
काल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी प्रति संसद भरवण्यात आली. त्यात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याची शिफारस करण्यात आली. विरोधक ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सर्व आयुधं वापरत असल्याचे दिसत आहे. लोकशाही मार्गाने संताप व्यक्त करत आहेत. काल राहुल गांधी यांनी जोरदार आणि आक्रमक भाषण केले. त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. भाजप ज्ञानेश कुमार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांनी आजच्या महारॅलीत नवीन राजकीय बॉम्ब टाकण्याचे संकेत दिले. काल मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोगाचा एक सांकेतिक प्रस्तावही मंजूर करण्यात आला.
भाजपकडूनही राहुल गांधींवर हल्लाबोल
राहुल गांधी यांच्या कालच्या भाषणाने राजकीय वातावरण तापले. भारतीय जनता पक्षानेही काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिली. मॉक पार्लमेंट हे एक नाटक असल्याची टीका भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली. आगामी निवडणुकीतील पराभव लक्षात आल्यापासूनच राहुल गांधी आणि काँग्रेस घटनात्मक संस्थांवर निराधार आरोप करत असल्याची टीका संबित पात्रा यांनी केली. मतदार याद्यांमधील सखोल पुनरीक्षण विषयी काँग्रेस समाजात दिशाभूल करत असल्याचा आरोपही पात्रा यांनी केला.
सकाळी १० वाजता सुरूवात
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघणार्या महारॅलीला आज सकाळी १० वाजता सुरुवात झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही रॅली रामलीला मैदानावर होत आहे. सकाळी इंदिरा भवन येथून मिंटो रोडपर्यंत खुल्या बसमधून इंडिया आघाडीतील प्रमुख नेते निघून पायी ते रामलीला मैदानाकडे निघाले. या रॅलीत ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील २० घटक पक्षांचे प्रमुख नेते सहभागी होतील. तर सीजेपी आणि इतर पक्षांनी सुद्धा या महारॅलीला पाठिंबा दिला आहे.
इंडिया आघाडीच्या आंदोलनाला पाठिंबा पण प्रत्यक्ष सहभाग नाही : अभिजीत दिपके
दरम्यान या रॅलीच्या आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीत पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. यामध्ये त्यांनी कथित मतदान चोरी, निवडणुक आयोग यांच्याविरोधात सीजेपीने समर्थन दिले. पण आज होणार्या विरोधी पक्षाच्या या रॅलीत सीजेपी सहभागी होणार नाही. त्यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांना त्यांची ओळख स्वतंत्र ठेवायची आहे. ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर बोलताना अभिजीत दिपके यांनी म्हटले की, मी टीएमसीच्या नेत्यांचे आभार मानण्यासाठी पोहोचलो होतो.
नीट पेपरफुटीविरोधात आमचे जंतरमंतरवर जे आंदोलन सुरू होते, त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी आमचे समर्थन केले. दिल्ली पोलिसांनी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना अटक केली होती, त्यावेळी ममता बॅनर्जी या आमच्यामागे भक्कमपणे उभ्या होत्या. आजच्या रॅलीत सहभागी होण्याबद्दल बोलताना अभिजीत दिपके यांनी म्हटले की, आम्ही या रॅलीचे पूर्णपणे समर्थन करतो. पण कॉकरोच जनता पार्टी त्या रॅलीत सहभागी होणार नाही.
आमचा पक्ष स्वतंत्र पक्ष आहे, त्यामुळे आम्ही विरोधी पक्षाच्या रॅलीत सहभाही होणार नाहीत. कोणीही मतचोरी विरोधात आंदोलन करत असेल तर त्याला सीजेपीचा पाठिंबा असेल. ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, आमच्या रॅलीला सीजेपीने पूर्णपणे समर्थन दिले. कोलकातामध्ये मी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे, त्याकरिता मी सीजेपीच्या नेत्यांना बोलवणार आहे.